May 28, 2026
IMG-20260525-WA0009

पाडळी गावच्या पाणीपुरवठ्याला धोका

करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील पाडळी येथील पाझर अधिग्रहण क्षेत्रात परवानगीविना विहीर खोदकाम सुरू असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर जलसंधारण विभागाने सदर विहीर बुजविण्याच्या सूचना देऊनही संबंधितांकडून विहिर बुजविण्यात आली नाही. यामुळे गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त करत पाडळी येथील आबासाहेब वायकर यांनी तहसीलदार करमाळा यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

वायकर यांच्या तक्रारीनुसार, पाडळी गावाच्या पूर्वेस असलेल्या पाझर तलावाचे काम गतवर्षी उत्तम प्रकारे पूर्ण झाले असून त्यामुळे गावातील पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. तलावाचे पिचिंग, सांडवा बांधकाम व चारी खोदण्याची काही कामे अद्याप बाकी आहेत. मात्र तलावाच्या खालच्या बाजूस आणि सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीपासून अवघ्या ३० ते ४० फुट अंतरावर आण्णा किसन ढाणे व बाबासाहेब बापूराव ढाणे यांनी कोणतीही अधिकृत परवानगी न घेता नवीन विहीर खोदण्याचे काम सुरू केल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे.

या प्रकारामुळे सार्वजनिक पाणीपुरवठ्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असून भविष्यात गावाला पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती वायकर यांनी व्यक्त केली आहे. याबाबत दि. ७ मे २०२६ रोजी उपअभियंता, पाटबंधारे विभाग, निमगाव (ह), ता. माढा यांच्याकडेही तक्रार केली होती. मात्र त्यानंतरही संबंधितांनी विहीरीचे खोदकाम सुरूच ठेवल्याचा आरोप वायकर यांनी केला आहे.

सदर अवैध विहिरीचे अर्धवट खोदकाम तात्काळ बुजवून भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करावी, अशी मागणी अर्जदार आबासाहेब वायकर यांनी प्रशासनाकडे केली आहे.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!