महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधीत असलेल्या गोवा निर्मीत विदेशी मद्यासह सव्वा कोटींचा मुद्देमाल जप्त
माळशिरस – आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माळशिरस पथकाने मळोली (ता. माळशिरस) येथे धाडसी कारवाई करत गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या विदेशी मद्याची मोठी खेप जप्त केली. या कारवाईत सुमारे रु. १ कोटी २४ लाख ७१ हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोन आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुप्त माहितीच्या आधारे निरीक्षक सचिन भवड व दुय्यम निरीक्षक सौरभ भोसले यांनी पथकासह सापळा रचून ही कारवाई केली. जप्त मुद्देमालात ७५० मिली क्षमतेच्या ८,४०० विदेशी मद्याच्या बाटल्या (७०० बॉक्स) किंमत रु. ९२.४० लाख, चौदा चाकी ट्रक किंमत रु. ३२ लाख तसेच तीन मोबाईल फोन किंमत रु. ३१ हजार यांचा समावेश आहे.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त सागर धोमकर, अधीक्षक भाग्यश्री जाधव व उपअधीक्षक सौरभ अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास दुय्यम निरीक्षक सौरभ भोसले करीत आहेत.

अवैध मद्यनिर्मिती, विक्री अथवा वाहतूक याबाबत माहिती असल्यास नागरिकांनी विभागाच्या टोल-फ्री क्रमांक १८००८३३३३३३ किंवा व्हॉट्सॲप क्रमांक ८४२२००११३३ वर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी केले आहे.

.

.

.

.

