डिकसळ पुलापासून ते आदिनाथ कारखान्यापर्यंत फक्त जनतेची फसवणूक; ऊस उत्पादक शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेचा संतप्त सवाल!
करमाळा, प्रतिनिधी – गेल्या १२ वर्षांपासून प्रलंबित असलेला डिकसळ पूल, शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा ‘आदिनाथ’ कारखाना, तालुक्याची दैनावस्था झालेले रस्ते आणि विजेचा गंभीर प्रश्न… या कोणत्याही मूलभूत समस्येवर ठोस काम न करता, करमाळा तालुक्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून फक्त सोशल मीडिया आणि वृत्तपत्रांमधून ‘श्रेय घेण्याची’ लाजीरवाणी स्पर्धा सुरू आहे. हा निव्वळ करमाळा तालुक्यातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार असून, “तुम्ही निवडून आलात म्हणजे आमच्यावर उपकार केले नाहीत, जनतेने तुम्हाला काम करण्यासाठीच निवडून दिले आहे,” अशा अत्यंत आक्रमक शब्दांत तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज संदीप उर्फ बाबुराव सरडे (चिखलठाण, ता. करमाळा) यांनी दोन्ही लोकप्रतिनिधींचे कान टोचले आहेत.

१२ वर्षे उलटली, पण डिकसळ पूल जसाच्या तसाच!
करमाळा तालुका (सोलापूर) आणि इंदापूर तालुका (पुणे) यांना जोडणारा इंग्रजकालीन डिकसळ पूल हा या भागासाठी जीवनवाहिनी आहे. २०१४ ते २०१९ या काळात नारायण पाटील आमदार होते आणि संजय शिंदे जिल्हा परिषद अध्यक्ष होते. या दोघांनीही पुलासाठी निधी आणल्याचा आव आणत पाच वर्षे केवळ श्रेयवादात घालवली.

२०२४ च्या निवडणुकीच्या तोंडावर संजय शिंदे गटाने काम सुरू झाल्याचे मोठे दावे केले, तर त्याला विरोध करत नारायण पाटील यांनीही आपली पूर्ण ताकद पणाला लावली. आदरणीय जयवंतराव जगताप साहेबांच्या कृपेने दोघांनाही आमदारकीची पदे मिळाली. आज नारायण पाटील यांच्या कार्यकाळाला दीड ते दोन वर्षे होत आली, तरीही गेल्या १२ वर्षांपासून या पुलाचे काम काडीमात्र झालेले नाही. दोन्ही गटांचे कार्यकर्ते केवळ ‘पेपरबाजी’ आणि श्रेय घेण्यासाठीच धडपडत आहेत, ही करमाळा तालुक्याची मोठी शोकांतिका आहे.

विद्यार्थी आणि शेतकऱ्यांचे हाल
तालुक्यातून बारामती ॲग्रो आणि अंबालिका कारखान्याला मोठ्या प्रमाणावर ऊस जातो, तसेच शेकडो विद्यार्थी इंदापूर तालुक्यात शिक्षणासाठी जातात. मात्र, या पुलाच्या दुरवस्थेमुळे सर्वांनाच नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

‘आदिनाथ’ रोहित पवारांकडे दिला असता, तर शेतकरी सुजलाम-सुफलाम झाला असता!
आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावरून सध्या दोन्ही गटांत फक्त एकमेकांवर चिखलफेक सुरू आहे. २०२४ च्या निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कारखाना सुरू करून मोठा गाजावाजा करण्यात आला. परंतु, कोट्यवधींचे कर्ज मिळूनही आज कारखाना अपयशाच्या दारात का उभा आहे? ही जनतेची फसवणूक नाही का? असा सवाल बाबुराव सरडे यांनी उपस्थित केला आहे. मोहिते पाटील यांच्या सांगण्यावरून जयवंतराव जगताप साहेबांनी ‘कारखाना सक्षमपणे जनतेसाठी चालवावा’ याच एका अटीवर कारखाना पूर्णपणे नारायण पाटलांच्या हातात दिला होता. पण आज परिस्थिती बिकट आहे. जर हा कारखाना आमदार रोहित पवार यांच्यासारख्या सक्षम आणि यशस्वी नेतृत्वाकडे दिला असता, तर आज आदिनाथ कर्जमुक्त होऊन शेतकरी सुजलाम-सुफलाम झाला असता, हीच प्रत्येक ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या मनातील खरी भावना आहे.

आमदारांच्या शिफारसीवरील अधिकाऱ्याकडूनच जगताप गटावर सूडबुद्धीने कारवाई!
तालुक्यात आज रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. विजेचा प्रश्न गंभीर आहे. विद्यमान आमदारांनी विजेच्या प्रश्नावर थेट आदेश देणे अपेक्षित असताना, ते केवळ ‘निवेदन’ देत फिरत आहेत, हे आश्चर्यकारक आहे! वाळू चोरी आणि जुगाराला तालुक्यात उजनी धरणातून ऊत आला आहे. वाळूवर दररोज डल्ला मारणारे कोण आहेत आणि तालुक्यातील ८० टक्के टिपर्सवर कोणाचे नाव आणि फोटो आहेत, हे आता लपून राहिलेले नाही.

कुर्डवाडी मर्डर प्रकरणात स्वतः आमदार पोलीस ठाण्यात जाऊन धरणे धरतात; परंतु शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांविरुद्ध आवाज उठवणाऱ्या शंभूराजे जगताप यांच्यावर दरोड्यासारखा खोटा गुन्हा दाखल होतो, तेव्हा आमदार नारायण पाटील यांचा ‘घाई’ बसतो आणि त्यांचे कार्यकर्ते गप्प बसतात. विशेष म्हणजे, ज्या अधिकाऱ्याने शंभूराजे जगताप यांच्यावर दरोड्याचा खोटा गुन्हा दाखल केला, तो अधिकारी स्वतः आमदार नारायण पाटील यांच्या शिफारस पत्रावरती तालुक्यात नियुक्त झालेला आहे आणि त्याचे संपूर्ण कुटुंब नारायण पाटील यांचे खंदे समर्थक आहे! यावरून या कारवाईमागे कोणती राजकीय सूडबुद्धी काम करत आहे, हे उघड होते.

केलेल्या कामांचे खरे श्रेय आदरणीय जयवंतराव जगताप साहेबांचेच!
कै. नामदेवराव जगताप साहेबांनी तालुक्यात यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, महात्मा गांधी विद्यालय काढले. तोच वारसा पुढे चालवत आदरणीय जयवंतराव जगताप साहेबांनी या करमाळा तालुक्यात सात शिक्षण संस्था व डीएड कॉलेज आणले. शंभूराजे जगताप यांनी तालुक्यात पहिले सीबीएसई (CBSE) पॅटर्नचे शिक्षण आणले. हा खऱ्या अर्थाने तालुक्याचा विकास आहे!
संजय शिंदे असोत की नारायण पाटील, हे दोघेही आज जे काही आहेत ते केवळ आणि केवळ आदरणीय जयवंतराव जगताप साहेब यांच्या कृपेमुळेच आहेत. जगताप साहेबांनी मेहरबानी केली आणि ताकद दिली म्हणूनच यांच्या नावापुढे ‘आमदार’ हे पद लागले. त्यामुळे या दोघांनीही त्यांच्या आमदारकीच्या काळात जी काही कामे केली असतील, त्या सर्व कामांचे खऱ्या अर्थाने श्रेय आदरणीय जयवंतराव जगताप साहेबांनाच जाते!
साहेबांनी यांना आमदार केले ते जनतेची कामे करण्यासाठीच, जनतेवर उपकार करण्यासाठी नाही! जर जगताप साहेबांनी यांना आमदारकीची संधी दिली नसती, तर यांना कामे करण्याची संधीच मिळाली नसती. त्यामुळे स्वतःच्या कामांचे ढोल वाजवण्यापेक्षा या दोघांनीही याचे श्रेय जगताप साहेबांना दिले पाहिजे. तसेच, त्यांच्या आमदारकीच्या काळात ‘न झालेल्या’ आणि रेंगाळलेल्या कामांचे पापही या दोन्ही आजी-माजी आमदारांचेच आहे, असे बाबुराव सरडे यांनी ठणकावून सांगितले.
विद्यमान आमदार नारायण पाटील हे मोठ्या नेत्यांसोबतचे फोटो टाकून आपले संबंध दाखवत असतात. मग या मोठ्या संबंधांचा आणि ओळखीचा वापर करून त्यांनी करमाळ्याच्या प्रलंबित डिकसळ पुलासाठी आणि विकासासाठी निधी का आणला नाही? असाही बोचरा सवाल त्यांनी केला.
