July 28, 2026
IMG-20260709-WA0017

करमाळा, प्रतिनिधी – वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध कृषी पुरस्कारांचे वितरण कृषी दिनाचे औचित्य साधून मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे करण्यात आले. प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या १८ व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान यावेळी करण्यात आला. यामध्ये करमाळा तालुक्यातील राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनीला कृषी निर्यात पुरस्कार २०२६ देऊन सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई ,राज्यमंत्री इंद्रनील नाईक,प्रतिष्ठानचे सचिव दीपक पाटील, अध्यक्ष डॉ. राजेंद्र बारवाले, कार्याध्यक्ष अविनाश नाईक, डॉ. बकुल पटेल, माजी आमदार मुश्ताक अंतुले, मुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत तुळवे या मान्यवरांच्या शुभ हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व ३५ हजार रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

कंपनीच्या यशस्वी वाटचालीवर प्रतिष्ठित पुरस्काराची मोहोर…
राजे रावरंभा शेतकरी उत्पादक कंपनीने करमाळा तालुक्यातील ७५६ शेतकऱ्यांना संघटित करून ३३ लाख रुपयांच्या भागभांडवलावर ५ कोटींहून अधिक उलाढाल साधली आहे. कंपनीने दुबईला केळीची यशस्वी निर्यात करून कृषी क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला असून आधुनिक काढणीपश्चात सुविधा, शीतसाखळी, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित हवामान केंद्र व आधुनिक कृषी तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरामुळे या उल्लेखनीय कार्याची दखल घेत वसंतराव नाईक प्रतिष्ठानने कंपनीला प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान केला आहे.
-डॉ. विकास वीर,
अध्यक्ष, राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनी.

.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!