May 6, 2026
IMG-20260422-WA0023

करमाळा, प्रतिनिधी – एकाच बंगल्यात वेगवेगळ्या माळ्यांवर राहणाऱ्या दोन भावांमध्ये सामायिक जागेत ठेवलेल्या वस्तूंच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यावसान मारामारीत झाले असून यानंतर दोन्ही कुटुंबातील व्यक्तींवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. तालुक्यातील केम येथील देवकर वस्ती येथे हा प्रकार घडला आहे.

याबाबत वासुदेव नामदेव देवकर (वय-४५ वर्षे, रा. देवकर वस्ती, केम ता. करमाळा) यांनी दि.२०/०४/२६ रोजी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.१९/०४/२६ रोजी रात्री ०८.१५ वाजण्याच्या सुमारास ते त्यांच्या आई चंद्रभागा यांना मोठा भाऊ माधव याने कडबाकुट्टी ढकलुन दिल्याबाबत तसेच पाण्याची मोटार काढल्याबाबत विचारत होते. यावेळी वासुदेव यांचा पुतण्या किरण माधव देवकर याने वासुदेव यांना दमदाटी करून गजाने डोक्यात तसेच डाव्या हाताच्या बोटांवर मारून जखमी केले तर वासुदेव यांचा मोठा भाऊ माधव नामदेव देवकर याने हात्याने वासुदेव यांच्या डाव्या पायाच्या बोटावर मारून जखमी केले. तसेच वासुदेव यांची भावजय मनिषा माधव देवकर यांनी शिवीगाळ करून वासुदेव यांच्या डाव्या हाताच्या कोपरावर, पाठीवर तसेच डाव्या पायाच्या मांडीवर काठी मारून जखमी केले.

तर याच घटनेबाबत माधव नामदेव देवकर (वय-५१ वर्षे, रा. देवकर वस्ती, केम, ता. करमाळा) यांनी दि.२०/०४/२६ रोजी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.१९/०४/२६ रोजी रात्री ०८.१५ वाजण्याच्या सुमारास त्यांचा भाऊ वासुदेव नामदेव देवकर याने कडबा कुट्टी व पाण्याची मोटार का हालवली असे म्हणून विटेचा तुकडा माधव यांच्या पोटात मारून जखमी केले. तसेच माधव यांचा मुलगा किरण याच्या पाठीत व डोक्यात बांबुची काठी मारून जखमी केले, तर माधव यांच्या पत्नी मनीषा यांच्या उजव्या हातावर, आई चंद्रभागा यांच्याही उजव्या हातावर बांबुची काठी मारून जखमी केले. माधव यांच्या भावजय गंगा यांनी माधव यांच्या पत्नी मनिषा यांना शिवीगाळ, दमदाटी करून केस ओढून लाथाबुक्यांनी मारहाण केली.

वासुदेव देवकर यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी किरण माधव देवकर, माधव नामदेव देवकर आणि मनिषा माधव देवकर तर माधव देवकर यांच्या फिर्यादीवरून वासुदेव नामदेव देवकर आणि गंगा वासुदेव देवकर यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३च्या विविध कलमांन्वये परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले असून पोलिस हवालदार महेश डोंगरे हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!