July 27, 2026
IMG-20260713-WA0078(1)

मुख्याधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल

करमाळा, प्रतिनिधी – आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर करमाळ्यातून निर्गमित होणाऱ्या संतश्रेष्ठ श्री निवृत्ती महाराज तसेच मराठवाडा, विदर्भातील विविध दिंड्या पालख्यांच्या नियोजनासंदर्भात जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन (IAS) पालखी मार्गाची पाहणी केली. यावेळी करमाळा शहरातील रस्त्यांची अवस्था पाहून लवकरात लवकर कामे पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी सचिन तपसे यांना दिल्या आहेत.

करमाळा तालुक्यातील रावगाव येथून संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पालखीचा जिल्ह्यात प्रवेश होतो. जिल्हाधिकाऱ्यांनी रावगाव येथून पालखी मार्गाची पाहणी सुरू केली. यानंतर करमाळा शहरातील सुमंत नगर भागातून त्यांचा ताफा तहसील कार्यालयात पोहोचला. तहसील कार्यालयात पंचायत समिती हॉलमधील बैठक आटोपून निघताना सिद्धार्थ नगर येथील सुरू असलेले रस्ते कॉंक्रिटीकरणाचे काम पाहिल्यानंतर त्यांनी मुख्याधिकारी सचिन तपसे यांना पालखी आगमनाच्या तोंडावर सुरू असलेल्या अर्धवट कामाबाबत विचारणा केली. यानंतर पुढे जुने विश्रामगृह ते पोस्ट ऑफिस दरम्यान असलेल्या रस्त्यावरून जात असताना रस्त्याची दुरावस्था पाहून पुन्हा ताफा थांबवून त्यांनी रस्त्याच्या दुरावस्थेबाबत मुख्याधिकारी तपसे यांना विचारणा केली. यावेळी तपसे यांनी हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असल्याचे सांगितले. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी डॉ.अमित कदम यांच्याकडे या रस्त्याबाबत विचारले असता कदम यांनी तीन वर्षांपूर्वीच हा रस्ता नगरपालिकेकडे वर्ग केला असल्याची माहिती दिली.

यामुळे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी मुख्याधिकारी तपसे यांना खडे बोल सुनावले. यानंतरच्या आषाढी पूर्व दौऱ्या वेळी शहरातील सर्व रस्त्यांचे व रस्त्याच्या साईड पट्ट्यांचे योग्य नियोजन करण्याबाबत तंबी देत जिल्हाधिकाऱ्यांचा ताफा देवळाली मार्गे जेऊरकडे पाहणीसाठी रवाना झाला. यावेळी या ताफ्यात प्रांताधिकारी जयश्री आव्हाड, करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!