करमाळा, प्रतिनिधी – कृषी विभागाच्या वतीने तालुक्यातील मांगी येथे बुधवार दि.३ रोजी शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना खरीप पूर्व पेरणीसाठी मार्गदर्शन करून बीज उगवण क्षमता तपासणी प्रात्यक्षिक करून दाखविले.

बुधवारी सकाळी मांगी गावातील विठ्ठल मंदिर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी गणेश माने व अजयकुमार बागल (आत्मा व्यवस्थापक) यांनी उपस्थित शेतकऱ्यांना बीज उगवण क्षमता तपासणीचे महत्त्व, बीज प्रक्रिया, जिवाणू संवर्धक, रासायनिक व जैविक बीज प्रक्रियेचे फायदे तसेच पीक उत्पादन वाढीसाठी आवश्यक बाबींविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच Mahavistar AI ॲपचे महत्त्व सांगून कृषी विषयक माहिती, सल्ला व विविध सेवांचा लाभ घेण्यासाठी उपस्थित शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड करून घेतले.

या कार्यक्रमास मांगी गावचे उपसरपंच नवनाथ बागल, प्रगतशील शेतकरी संभाजी बागल यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रशिक्षण कार्यक्रमास मांगी परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

.

.

.

.

