करमाळा, प्रतिनिधी – समृद्ध पंचायतराज मध्ये सहभाग घेतलेल्या तालुक्यातील उंदरगावात प्रत्येक घराच्या सभोवताली ग्रामस्थांनी लोकसहभागातून परसबाग फुलवल्या आहेत. संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने तयार झालेल्या या पालेभाज्यांमुळे उंदरगाव सह पंचक्रोशीतील लोकांची सेंद्रिय पालेभाज्यांची गरज भागत असल्याचे उंदरगावचे सरपंच युवराज मगर यांनी सांगितले आहे.

करमाळा शहरातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (+२ स्तर)च्या स्वयंसेवकांच्या सहकार्याने उंदरगावातील ५० पेक्षा जास्त कुटुंब हा उपक्रम राबवत आहेत. गावातील पालेभाज्यांची गरज या परसबागेमधून भागवली जात आहे. पालेभाज्यांशिवाय अनेक फळझाडांचीही लागवड या परसबागांमध्ये करण्यात आली आहे. या परसबागांचे कुतूहल आसपासच्या गावातील ग्रामस्थांमध्येही झालेले असून भोवतालच्या भागातील ग्रामस्थ उंदरगाव मध्ये चालवल्या जाणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमाला भेट देऊन माहिती घेत आहेत. या उपक्रमामुळे संपूर्ण गाव कोकणासारखे हिरवेगार फुलले आहे.

उंदरगावचे सरपंच युवराज मगर, उपसरपंच सौ.प्रभावती रामहरी गरदडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि ग्रामविकास अधिकारी यशवंत कुदळे यांच्या मार्गदर्शनामुळे संपूर्ण ग्रामस्थांमध्ये या अभियानाच्या माध्यमातून नवचैतन्य निर्माण झाले आहे.

.

.

.

.

.

