करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील शेतकऱ्यांना सध्या लोडशेडींगचा फटका बसत असल्याने हजारो हेक्टर क्षेत्रावर असलेली पिके धोक्यात आली आहेत. महावितरणकडून होत असलेल्या या अन्यायाविरुद्ध विद्यमान आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी करमाळा शहरातील दत्त मंदिरापासून तहसिल कचेरीवर मोर्चा काढण्यात आला.
गेल्या अनेक दिवसांपासून महावितरणच्या वीज कपातीमुळे आणि विस्कळीत वीज पुरवठ्यामुळे तालुक्यातील शेतकरी हैराण झाले आहेत. त्यातच टंचाईच्या नावाखाली उजनी लाभक्षेत्रात केवळ चारच तास आणि तोही विस्कळीतपणे वीजपुरवठा केला जातो, मात्र पलीकडील तालुक्यात मात्र सुरळीत वीजपुरवठा केला जातो. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. भगिरथ योजनेची वीजही महावितरणकडून बंद ठेवली जाते. असे अनेक प्रश्न शेतकरी वर्ग आ. पाटील यांच्याकडे घेऊन येत असल्याने त्यांनी हा मोर्चा काढून अधिका-यांना या अन्यायाबाबत जाब विचारला.
यावेळी महावितरणच्या बार्शी विभागाचे कार्यकारी अभियंता मगर, करमाळा तहसिलदार शिल्पा ठोकडे, महावितरण जेऊर विभाग उप कार्यकारी अभियंता भोयर, करमाळा विभाग उपकार्यकारी अभियंता कलावते यांनी आ. पाटील यांनी दिलेले निवेदन स्विकारले व लवकरात लवकर वीजप्रश्नी योग्य ती कार्यवाही करण्याचे मान्य केले. करमाळा तालुक्यातील शेतकरी सध्या नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकटात सापडला आहे. एकीकडे त्यास वादळीवाऱ्यासह पावसामुळे शेतातील पिके जमिनदोस्त झाल्याने फार मोठा बसला आहे तर दुसरीकडे महावितरण कडुन झालेल्या वीज कपातीमुळे हातातील पिकांना धोका निर्माण झाल्याने आणखी एका आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी महावितरण कंपनीने सर्वाना समान न्याय या तत्वावर करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना सुध्दा आठ तास अखंडीत व पुर्ण दाबाने वीज पुरवठा करावा यासाठी आजपासून अंमलबजावणी करावी असे सांगितले. -आ. नारायण पाटील, करमाळा.
.
.
.
.