July 28, 2026
IMG-20260716-WA0035

विद्यार्थीनींच्या सुरक्षिततेसाठी युवासेना सरसावली; उद्या आगार प्रमुखांच्या दालनात ठिय्या

करमाळा, प्रतिनिधी – करमाळा आगाराला नवीन बसेस उपलब्ध होऊनही बससेवा सुरळीत होत नसल्याने शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बसेस वारंवार बंद पडणे, वेळापत्रक पूर्णपणे कोलमडणे आणि विद्यार्थ्यांना रात्री उशिरापर्यंत बसस्थानकावर थांबावे लागणे यामुळे विशेषतः विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

आज (गुरुवारी) सकाळी गौंडरे-अंजठानगर मार्गावरील एसटी बसचा गिअरबॉक्स निकामी झाल्याने ती अर्जुननगर रस्त्यावर बंद पडली. त्यामुळे प्रवासी व विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अशा घटना सातत्याने घडत असल्याने करमाळा आगाराच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

पूर्वभागातील हिवरे, हिसरे, कोळगाव आदी गावांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी करमाळ्यातील महात्मा गांधी हायस्कूल, अण्णासाहेब जगताप हायस्कूल तसेच यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात शिक्षणासाठी येतात. शाळा-कॉलेज सुटल्यानंतर हे विद्यार्थी गौंडरेमार्गे बार्शी जाणाऱ्या बसने घरी परततात. मात्र पूर्वी साडेचार वाजता सुटणारी ही बस आता दररोज सायंकाळी सहा ते सात वाजल्यानंतरच फलाटावर लागत असल्याचे दिसून येत आहे.

यात कहर म्हणजे सोमवारी (दि.१३ जुलै रोजी) बार्शीकडे जाणारी बस रात्री तब्बल ८ वाजता फलाटावर लागली. ही बस साडेआठच्या सुमारास हिवरे येथे पोहोचली. अंधार पडलेला असल्याने आणि रस्त्यावर स्मशानभूमी असल्यामुळे बसमधील इयत्ता आठवीतील एका विद्यार्थिनीने गावापासून सुमारे ५०० मीटर पुढे असलेल्या मंदिराजवळ, ज्या मार्गाने बस जात होती, तेथे घराजवळ सोडण्याची विनंती चालक-वाहकांना केली. मात्र, बस थांबविता येणार नसल्याचे सांगत तिची विनंती फेटाळली. परिणामी विद्यार्थिनीला स्मशानभूमीजवळील रस्त्यावरून घाबरत पळत घरी जावे लागले. या घटनेनंतर ती मुलगी अजूनही भीतीमुळे रात्री दचकून उठत असल्याचे पालकांनी सांगितले आहे.

करमाळा आगाराच्या अशा निष्काळजीपणामुळे बस उशिरा पोहोचूनही विद्यार्थिनीची परिस्थिती लक्षात न घेता मंदिराजवळ बस न थांबविणाऱ्या संबंधित चालक-वाहकांवर कारवाई करावी, अशी मागणी पालक व नागरिकांकडून होत आहे.

उद्या युवासेनेचा आगार प्रमुखांच्या दालनात ठिय्या

करमाळा आगारातील बसेस गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार रस्त्यात बंद पडत आहेत. नवीन बसेस आल्यानंतरही लांब पल्ल्याच्या मार्गांवर जुन्याच बसेस धावत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांसाठीच्या बसचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले असून अनेकदा तक्रारी करूनही सुधारणा होत नसल्याचा आरोप युवासेनेने केला आहे. आठवी ते दहावीतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना रात्री आठ वाजेपर्यंत बसस्थानकावर थांबावे लागत असेल आणि या काळात एखादा गैरप्रकार घडला तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी उपस्थित केला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसह उद्या करमाळा आगार प्रमुखांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!