ज्येष्ठ पत्रकार नरसिंह (आप्पा) चिवटे यांच्या ८६ व्या वाढदिवसानिमित्त पार पडले विविध उपक्रम
करमाळा, प्रतिनिधी – जेष्ठ पत्रकार नरसिंह चिवटे यांच्या ८६ व्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने शहरात रविवार दि.१९ रोजी आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरात तज्ञ डॉक्टरांकडून ४८९ रुग्णांची मोफत तपासणी करून मोफत औषधे वाटण्यात आली तसेच या शिबिरात ३७२ रुग्णांना मोफत चष्मे वाटण्यात आले.

या शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून करमाळ्याचे माजी उपनगराध्यक्ष सोमनाथ चिवटे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, नगरसेवक दादा इंदलकर, आदिनाथचे संचालक देवानंद बागल आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जतन फाउंडेशन (पुणे) यांच्या वतीने अमेरिकन बनावटीचे अत्यंत दर्जेदार ३७२ चष्मे मोफत वाटण्यात आले. यासोबतच शेकडो रुग्णांची तपासणी करून लाखो रुपयांच्या औषधे गरजू रुग्णांना मोफत देण्यात आली. या आरोग्य शिबिरासाठी करमाळा उपजिल्हा रुग्णालय, नर्गिस कॅन्सर हॉस्पिटल (बार्शी), सुविधा हॉस्पिटल (बार्शी), गरुड हॉस्पिटल (अहिल्यानगर) आदी हॉस्पिटलमधील तज्ञ ४० डॉक्टरांनी योगदान दिले.

हे शिबीर यशस्वी करण्यासाठी करमाळा तालुका वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख नागेश चेंडगे, संजय जगताप, राजेंद्र मेरगळ, निलेश चव्हाण, शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. गौतम रोडे आदींनी परिश्रम घेतले.

ज्येष्ठ पत्रकार नरसिंह (आप्पा) चिवटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने करमाळा शहरातील देवीचा रोड लगत उभारण्यात आलेल्या स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिकृतीचे लोकार्पण करण्यात आले. यासोबतच शिबिरात सहभागी वारकरी रुग्णांना ज्ञानेश्वरीच्या ४०० प्रती भेट देण्यात आल्या. वाढदिवस समारंभा दरम्यान दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी भ्रमणध्वनीवरून चिवटे यांना शुभेच्छा दिल्या.

करमाळा तालुक्यात आत्तापर्यंत शिवसेनेच्या वतीने ३८ आरोग्य शिबिरे घेऊन जवळपास १५,००० रुग्णांना मोफत सेवा देण्यात आली आहे. याशिवाय शिवसेनेने कोरोना काळात सुरू केलेले अन्नछत्र व रुग्णांना केलेली कोट्यवधी रुपयांची आर्थिक मदत उल्लेखनीय आहे.

.

